सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Sunday 8 July 2018

माझी बदली- तळेवस्ती to गुरेवाडी

      


#बदली निमित्ताने मनातील थोडी धगधग.
        2009 मध्ये नांदगाव मध्ये पाऊल ठेवले, शाळा तळेवस्ती येथे प्रथमच रुजू होण्यासाठी. ऑर्डर वरील शाळेचे नावही वाचताना होणारी अडचण, अन् शाळा पाहूनच आलेली निराशा भयानकच होती. कारण शाळा मेंढपाळ लोकांच्या घरात भरत होती- जिथे रात्री मेंढ्या बसायच्या अन् दिवसा आम्ही. वडील भावाप्रमाणे गोरख जाधव सरांनी सांभाळून घेत माझा शाळा प्रवास सुरु झाला. सुरुवातीचे काही वर्षे प्रशासन, परिस्थिती समजून घेताच कसे निघून गेले कळलेच नाही.
            दरम्यान 'माझी समृद्ध शाळा' उपक्रम राबवत असताना आलेल्या तुमच्या शाळेची ब्लॉग-वेबसाईट आहे का?  ह्या एका प्रश्नाच्या उत्तराखातर मिळालेली संजीवनी अविस्मरणीयच ठरली. शून्य अनुभवातून सुरू केले स्वतःचेच स्वतःशी क्लास. गुगललाच गुरू बनवलं. अन् तालुक्यातला "ज्ञानामृत"(talevasti.blogspot.in) हा प्रथम शाळेचा ब्लॉग अवतरला. या एका क्षणाने माझी ओळखच बदलली. आनंद गगनात मावेना. मग मी शाळेतील उपक्रम ब्लॉग व युट्युबद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवू लागले. 
         बाल आनंद मेळावा, स्नेहसंमेलन, महिला मेळावा, पालक भेट, वृक्षारोपण, संगीतमय परिपाठ, ज्ञानरचनावाद, व्हिडीओ निर्मिती,आनंददायी अध्ययन-अध्यापन सारखे विविध उपक्रम राबविता-राबविता शाळा उपक्रमशील झाली. शाळेला संगणक, टीव्ही, टॅब मिळाला अन् शाळा डिजिटल झाली.
          प्रत्येक शाळेत महिला शिक्षिका हवीच आणि मी शाळेतील प्रथम महिला शिक्षिका म्हणून मुले माझ्याभोवती रेंगाळू लागले जसं आई अन् लेकरू. शाळा ही माझं कुटुंबच बनली. माता भगिनीं(मैत्रिणी)मुळे उपक्रम फुलून जायचे. पालकांना आम्हां शिक्षकांचं खूप कौतुक असायचं. अजूनही आहे. पण बदलीच्या वाऱ्याने पालकांचं मन दुखावलं गेलं.
         कार्यालयाची सोपस्कर आटोपून तळेवस्ती शाळेत बदलीनंतर आज प्रथम पाऊल ठेवलं. सर्वजण माझी वाटच पाहत होते. मी येताच सर्वांनी हातातील कामे सोडून धावत पळतच शाळेकडे धाव घेतली. काही विद्यार्थी अगोदरच व्हरांड्यात येऊन बसलेले होते. पालकही वार्ता कळताच हजर. सर्वजण फक्त डोळ्यांतूनच बोलत होते. पालकांनी माझ्या निरोपाचा कार्यक्रम ठेवला. एका अनामिक दुःखाचा आवंढा गिळत निरोपाची रेलचेल शाळेत सुरू झाली. सर्व महिलांनी शाळेत जेवणाची तयारी केली पण प्रथमच मला सोडून.आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकानेच माझ्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. हे सर्व बघून मन सतत भरून यायचं. कसं सावरायचं स्वतःला अन् या सर्वांना. तुम्ही जाऊ नका ना! हे वाक्य ऐकताना आभाळ फटल्यागत व्हायचं. सर्वांच्याच नयनी आसवांचे पूर. भरलेले डोळे खूप काही बोलत होते. अन् माझी अवस्था? मी काय सोडून आले? याची तिळमात्र कल्पनाही कोणी करू शकत नाही. मी माझं सर्वस्वच तळेवस्तीला सोडून आले.
          खरंच ! किती हे प्रेम! आपल्या लोकांपेक्षा जास्तच माया यांनी लावली, जणू सर्वस्वच झाले. सर्वांनी माझा जो सन्मान केला माझ्यासाठी तो सर्वोच्च पुरस्कारच म्हणेन. त्यांच्या या रुणाची उतराई होणं कठीणच. मी पालकांच्या परीक्षेत खरी उतरल्याचं समाधान मला मिळालं. मी भाग्यवान आहे की मी शिक्षक आहे. आणि माझा अट्टाहास हाच होता की जे मला नाही मिळालं ते सर्व या बालकांना मिळावं आणि त्यांनी सुसंस्कृत व्हावं. सर्वच उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण अन् निकोप असावं.आणि हो, तशीच संस्कारक्षम पिढी ह्या शाळेत शिक्षण घेत आहे. तळेवस्तीचा शाळा हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय राहील, कारण आमचे ऋणानुबंध तेवढे घट्ट होते.
        बदली माझ्या गावाकडं झाली पण कुठे आहे तो आनंद? नांदगाव तालुक्याने मला खूप काही दिले- शिकण्याची संधी अन् संधीचे सोने करण्यासाठी सुंदरशी परिस्थिती. माझ्या पोखरी केंद्रात मला खूप प्रेमळ माणसं मिळाली. गोरख जाधव सरांनी शाळा प्रवासात माझी खूप चांगली सोबत केली. कदाचित तशी सोबत पुन्हा होणे नाही.विस्तार अधिकारी ठोके मॅडम यांचे मी विशेष धन्यवाद मानेन, कारण त्यांनी मला सदैव शाबासकी देऊन खूप मोठं बनवलं. सर्वांचेच विशेष आभार. अशीच साथ सदैव असू द्या.

आशा चिने
शाळा गुरेवाडी,ता. सिन्नर (नवीन शाळा)


जि प प्राथ. शाळा तळेवस्ती गंगाधरी, ता नांदगांव (नाशिक)- प्रथम शाळा